कोल्हापूर : मानोली पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पानाच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंब्याच्या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मानोली धरण आहे.
या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे आहे. शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दत्तात्रय धोंडिबा गोमाडे हे मानोली गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांची जनावरे मानोलीच्या जंगलात चरायला आणि पाण्यासाठी घेऊन जातात.
नेहमीप्रमाणे ते 20 मार्चला त्यांच्या जनावरांसह जंगलात गेले. यावेळी त्यांना गळ्यात पांढऱ्या ओढणीने गुंडाळलेला अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून जंगलाच्या एका कोपऱ्यात फेकून दिल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तत्काळ शाहूवाडी पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.