नवी दिल्ली : चिराग परिसरात दोन महिन्यांच्या चिमुरडीची तिच्या आईनेच गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरातील मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवला होता.
मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. घराची झडती घेतली असता ओव्हनमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला.
मालवीय नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मुलीच्या आईनेच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या पालकांची चौकशी करीत आहेत.
पोलिस उपायुक्त विनिता मेरी जेकर यांनी सांगितले की, गुलशन कौशिक हे चिराग परिसरात कुटुंबासह राहतात. या कुटुंबात पत्नी डिंपल कौशिकशिवाय चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी आहे.
गुलशनची आई आणि भाऊही त्याच्यासोबत राहतात. गुलशन त्यांच्या घराखाली किराणा मालाचे दुकान चालवतात. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चिराग परिसरातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जिथे मुलीची आजी आणि शेजारी घरातील मुलीचा शोध घेत होते. तेव्हा घराची झडती घेतली असता, मुलीचा मृतदेह घराच्या दुसऱ्या मजल्यावर खराब झालेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आढळून आला.
मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मुलीचा जन्म 27 जानेवारी 2022 रोजी झाल्याचे समोर आले. तसेच मुलीच्या आईला मुलगा हवा होता, त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर ती आनंदी नव्हती.
शेजारी आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डिंपल आणि तिच्या पतीमध्ये याच कारणावरून वारंवार भांडणे होत होती. ज्या खोलीतून मुलीचा मृतदेह सापडला त्या खोलीला बाहेरून कुलूप होते.