मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असून त्यात आज मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात केवळ ९७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. विशेषत: दोन वर्षांनंतर राज्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली गेली आहे.
यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली आली होती.
राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 525 आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 77 लाख 23 हजार 005 कोटी बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्क्यांवर पोहोचले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 89 लाख 09 हजार 115 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 72 हजार 300 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 09.98 टक्के आहे.
मुंबईत आज ४८ नवे रुग्ण
मुंबई महापालिकेत आज तब्बल 48 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासांत एकूण 54 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 37 हजार 611 वर पोहोचली आहे.
तसेच मुंबईत गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६ हजार ६९३ झाली आहे.