कसायाला लाजवेल असा धंदा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुरु : आमदार राम सातपुतेंचा विधानसभेत संताप

कसायाला लाजवेल असा धंदा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुरु : आमदार राम सातपुतेंचा विधानसभेत संताप

पुणे : आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या अनेक गरीब व गरजू रुग्णांवर धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यास नामांकित रुग्णालये टाळाटाळ करत आहेत.

असाच प्रकार पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडला असून त्यांनी रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम केले आहे.

माळशिरस मतदारसंघातील एका गरीब रुग्णाचा रुग्णालयाने उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत सदर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली.

भाजपाचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत आज लक्षवेधी मांडली.

यावरील चर्चेदरम्यान आमदार सातपुते यांनी गरीब व गरजु रुग्णांवर उपचार करताना मोठी रुग्णालये कशा प्रकारे टाळाटाळ करतात आणि त्यातून या रुग्णांचा जीव कसा जातो हे पोटतिडकीनं मांडलं.

मोठमोठी रुग्णालये सरकारी भूखंड घेऊन बांधली गेली आहेत. त्याठिकाणी गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांच्या सूचना आहेत.

नियमावली आहे. मात्र, सह्याद्री हॉस्पिटल, रुबी, संचेती, दीनानाथ मंगेशकर अशा नामवंत रुग्णालयात धर्मादाय कोट्यातून गोरगरिबांचे उपचार होत नाहीत.

ही रुग्णालये कोणालाही जुमानत नाहीत. जर गरीब व गरजू रुग्णांचे उपचारच हे करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार नाही तर आम्ही सभागृहात बसायचे कशाला? असा संतप्त सवाल आमदार राम सातपुते यांनी केला. यावेळी आमदार सातपुते यांचा रौद्रावतार सभागृहात पाहायला मिळाला.

लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान आमदार राम सातपुते म्हणाले की, सह्याद्री रुग्णालयाच्या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

परंतु, त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. अशा नामवंत रुग्णालयांमध्ये एजंटचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप करत तातडीने आरोग्यमंत्री, धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक लावण्याची मागणी आमदार सातपुते यांनी केली.

त्यावर आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या संदर्भात स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून आणि पुणे धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत चौकशी सुरू आहे.

येत्या महिन्याभरात चौकशी पूर्ण करून तातडीने कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहात दिली.