आजपासून साहित्यिकांचा मेळा : उदगीर साहित्य संमेलनात लेखकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न, 162 पुस्तकांचे प्रकाशन; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा रद्द

Attempts to promote authors at Udgir Sahitya Sammelan, publication of 162 books; President Ramnath Kovind's visit canceled

उदगीर : साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर तब्बल १६२ पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळी करण्याचा विडा उदगीरकरांनी उचलला आहे. यानिमित्ताने नवोदित लेखकांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, ही अपेक्षा आहे.

पुस्तक प्रकाशनाचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसून विशेषतः ग्रामीण भागातील लेखकांचे साहित्य यामुळे अप्रकाशित राहाते. हीच बाब लक्षात घेता या व्यासपीठावरून १०० रुपये नाममात्र शुल्क आकारून लेखकांच्या साहित्याला प्रकाशझोतात आणण्याची संधी देण्यात आली आहे.

याचा लाभ घेत महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश आदी ठिकाणच्या लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपले साहित्य वाचकांपर्यंत पोहोचावे हीच खरी मानाची बाब असल्याचा विश्वास या उपक्रमाचे समन्वयक प्रा. एस. एम. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील विविध प्रकाशकांची उपस्थिती या संमेलनानिमित्ताने राहणार आहे. त्यामुळे नवोदित लेखक आणि प्रकाशकांची प्रत्यक्ष चर्चा होऊन पुढील प्रकाशनाचा मार्गही सुकर होणार आहे.

तीन दिवसांच्या संमेलनात दररोज किमान ५० पुस्तकांचे प्रकाशन अशी तीन टप्प्यांत १६२ पुस्तकांची विभागणी करण्यात आल्याचे आयोजकांनी या वेळी सांगितले.

फटाक्यांच्या आतषबाजीत सासणे यांचे स्वागत

पुणे – ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अशा मंगलमय वातावरणात ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे उदगीर नगरीत स्वागत करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन भारत सासणे यांचे स्वागत केले.

उदगीर रेल्वेस्थानक येथे सकाळी साडेसात वाजता भारत सासणे आणि त्यांच्या पत्नी मीना सासणे यांचे आगमन झाले.

संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तुरकर, सुभाष देशपांडे यांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे ससाणे यांचे स्वागत केले. संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे स्वागत करताना कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर. समवेत रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर आदी.

“हिरकणी’ ग्रुपचा पुढाकार
बीडच्या ‘हिरकणी’ ग्रुपतर्फे लेखिकांच्या एकूण ५५ पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन या सोहळ्यात होणार आहे हे विशेष. यासाठी या महिला स्वयंस्फूर्तीने ठराविक वेशभूषेत उपस्थित राहणार आहेत.