नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आपल्याला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले आहे, दिल्लीपुढे कधीही व केव्हाही झुकणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढा देण्याचा इशारा दिला.
नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.
गेल्या काही वर्षांत देशात मोठे बदल झाले आहेत. शेतकरी देशाच्या अन्नाची गरज भागवतात. देशाला शेतकऱ्याचा अभिमान आहे. मात्र शेतकरी आत्महत्या अत्यंत दुखद आहेत, त्या बेचैन करीत आहेत.
आपल्या देशात 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र लढण्याची गरज असल्याचेही शरद पवार म्हणाले.
देशात अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. संसदेत तीन कृषी विधेयकांवर चर्चा झाली नाही, राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस लढण्यासाठी मैदानात उतरेल, असेही पवार म्हणाले.
15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सन्मानावर भाषण केले होते. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि गुजरात सरकारने दुसरीकडे बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना माफ करायचे, हि दुटप्पी भूमिका भाजपाची ओळख आहे.
देशात महागाई वाढली आहे. त्याच दरम्यान भाजपचे नेते देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्याचा दावा करून इंग्लंडला मागे ढकलल्याचा दावा करतात, मात्र भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या तुलनेत खूपच कमी असल्याची टीकाही पवार यांनी केली.
भारत-चीन सीमेवरील पेट्रोलिंग पॉईंटवर चीनने नियंत्रण मिळवले आहे. देशांच्या पंतप्रधानांनी देशात कोणीही घुसले नाही, असे सांगितले होते, पण पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केली आहे. सीमेवर एप्रिल 2020 मध्ये जी परिस्थिती होती तशी नाही, असेही पवार म्हणाले.