ठाणे : ‘छेडेंगे तो छोडेंगे नही’ असा ईशारा देणाऱ्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी हा मुंब्र्यातून फरार झाल्याचे उघड झाले आहे.
मुंब्रा पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमावाला रस्त्यावर एकत्र आणून भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतकलेल्या कठोर भूमिकेसंदर्भात दि. १५ एप्रिल रोजी अब्दुल मतीन शेखानी याने एका विशिष्ट धर्मियांच्या समुदायास रस्त्यावर एकत्रित आणून बेकायदेशीरपणे भाषण केले.
‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा धमकीवजा ईशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने विना परवानगी सभा घेऊन जमलेल्या समुदायासमोर भडकावू भाषण केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांकडून अब्दुल मतीन शेखानी आणि इतर ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अब्दुल मतीन शेखानी हा सध्या फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.