मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदीतील भोंग्यांवर घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. त्याची दखल घेत गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घेण्यास सांगण्यात आले असून आगामी काळात राज्यात काय करता येईल, याची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेत असून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. जर कोणी राज्याची कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
तसेच, “सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये निर्णय दिला होता. तेव्हापासून राज्य सरकारने 2015 मध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देण्याची प्रक्रिया सांगणारे काही जीआर जारी काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीबाबतही सूचना देण्यात येतील. आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री यांनी म्हटले आहे.